fbpx

एका कोकणी मुलीची आणि तिच्या लाडक्या होडीची गोष्ट या अंकाची cover story आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच Emotional intelligence वर आधारित या गोष्टीची सुंदर चित्रं शुभम लखेरा यांनी काढली आहेत. चिकूपिकू ऑगस्ट अंकाच्या मुखपृष्ठावर ही मुलगी आपल्या बाहुलीला घेऊन होडीत बसली आहे आणि म्हणते आहे,

‘मी अन माजी भावली-टिंगू
नावेमंदी आमी खेळतो गो
चमचम वालूची करितो टेकडी
नावेमंदी जेवतो झोपतो गो..

आगरी भाषेतले काही शब्द या गोष्टीत आहे. प्रमाणभाषेप्रमाणेच काही वेगळ्या बोली-भाषा मुलांच्या कानावर पडाव्यात हा यामागचा उद्देश आहे.

ऑगस्ट महिन्यात भरपूर सणवार येतात. आपला राष्ट्रीय सण म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिनसुद्धा याच महिन्यात असतो. या वर्षी तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी बाप्पांचं आगमनही होणार आहे. या सणांची गंमत सांगणारा आणि शरीर-स्नायूविषयक बुद्धिमत्ता वाढवणारा एक खेळ अंकात दिला आहे.

या ऑगस्ट महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. नाग विषारी असतो, तो आपल्याला दंश करून मारतो इतकंच आपण मुलांना सांगतो. पण नाग का चावतो? याविषयी गिरीश जठार यांनी एक मस्त गोष्ट लिहिली आहे.

‘गोपाळकाला’ म्हणजे वेगवेगळे पदार्थ एकत्र मिसळून केलेला खाऊ. कृष्णजन्माष्टमीला आपण हा खाऊ बनवतो, मुलांमध्ये वाटतो. बाळगोपाळांनी एकत्र गोळा करून कालवलेला खाऊ म्हणून त्याला नाव पडलं गोपाळकाला. चिकूपिकू आणि त्यांच्या मित्रांनीपण असाच खाऊ जमा करून, एकत्र मिळून खाल्ला. त्यांना ही आयडिया कशी बरं सुचली? हे वाचू या ‘चिकूपिकूच्या गोष्टीत’.

ऑगस्ट महिन्यात येणारा तिसरा सण म्हणजे राखीपौर्णिमा त्याला नारळीपौर्णिमा असंही म्हणतात. पण ही राखी बांधण्याची प्रथा कशी सुरु झाली? याची गोष्ट डॉ. आर्या जोशी यांनी सांगितली आहे.

यावेळी फिशिराच्या गोष्टीत समुद्रातल्या ‘निळामेळा’ नावाच्या सणाची गंमत आहे. छबी आणि बागुलबुवा ज्या नीलग्रहावर गेले आहेत तिथे ‘बुटू्टू’ नावाचा सण सुरु होतोय ज्याची तिथे जोरदार तयारी चालली आहे. बाकी मराठी म्हणीची गोष्ट, कोडे, चिमणी चित्रं अंकात आहेतच. मुलांना रंगवण्यासाठी राखीचे चित्र आहे.

आभा भागवत यांनी यावेळी ‘क्लाॅड मोने’ या निसर्गावर आणि निसर्गाच्या रचनेवर प्रेम करणाऱ्या चित्रकाराची ओळख करून दिली आहे. ‘सायन्स सैर’ मध्ये यावेळी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाची गोष्ट सोप्या चित्रांमधून दिलेली आहे. विद्याधर शुक्ल यांनी लिहिलेलं छोटं बडबडगीतसुद्धा अंकात आहे. अंकाच्या शेवटच्या पानावर ४ वर्षाच्या सम्यकने लिहिलेली बदकाची गोष्टही फारच गोड आहे.

झाडी-गोडी हे नवीन सदर चालू करतोय. आपल्या आजूबाजूला अनेक झाडं असतात जी आपण नेहमीच बघत असतो पण आपल्याला त्यांच्याविषयी तितकी माहिती नसते. अशाच एका ‘टेटू’ नावाच्या झाडाची गोष्ट सांगितली आहे केतकी घाटे यांनी. हा अंक वाचल्यावर आपल्या आजूबाजूच्या परिसरात हे झाड दिसतंय का हे मुलांसह नक्की बघा.

Marathi Kids Magazines

डॉ. श्रुती पानसे यांच्या ‘मूल प्रश्न’ मध्ये यावेळी मुलांच्या भांडणाचा विषय आहे. घरात एकत्र खेळायला आलेली मुलं अनेकदा भांडतात, रुसतात, एकमेकांना चिडवतात अशावेळी पालक म्हणून आपण कसं वागावं हे समजून घेण्याचा या ‘मूल प्रश्न’ मधून नक्कीच प्रयत्न करता येईल.

एकंदरीत, ऑगस्ट अंक हा सणांच्या गमती-जमती सांगणारा तर आहेच पण प्रेम, वात्सल्य, कृतज्ञता, एकत्र येणं आणि आनंद साजरा करणं किती सुंदर असतं हे सांगणारा आहे. या अंकातल्या गोष्टींमधून पालक आणि मुलांना या सणांमागची मज्जा अनुभवता येईल.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop