fbpx

अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो ‘मुलांना वळण कसं लावायचं?’ ‘असं कर, तसं कर, अमुक करू नकोस’  या सूचना चालूच असतात. पण आई- बाबा आपल्याला एखादी सूचना का देतात? त्याचं महत्व काय, हे मुलांच्या लक्षात येत नसतं. 

छोट्या छोट्या गोष्टींचं वळण लावण्यासाठीच्या काही टिप्स बघू या  …. 

खाण्या-पिण्याचं वळण –

१. घरात सॉस, स्प्रेड्स, जॅम असे ऑप्शन्स जास्त ठेवूच नका. हे पदार्थ घरी आहेत हे जेव्हा मुलांना माहीत असतं तेव्हा ते ‘भाजी ऐवजी सॉस नाहीतर जॅम दे’ असा हट्ट धरणारच .

२. खूप हट्ट होत असेल तर ‘आधी भाजी पोळी संपवू आणि मग खाऊ देईन.’ असं कधीतरी सांगता येईल.

३. अनेकदा आपण जेवणासाठी मुलांच्या मागे लागतो पण पाच वर्षांच्या पुढची मुलं भूक लागली की स्वतः खाणं मागू शकतं. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा.

४. जेवणाच्या वेळी स्क्रीन टाईम नकोच. संपूर्ण घरासाठी तसा नियमच घालून घेता येईल. त्याऐवजी ऑडिओ स्टोरीज, गोष्ट वाचणे असे पर्याय आपण देऊ शकतो.

५. जंक फूड – वेफर्स, चॉकलेट, मॅगी अशा पदार्थांसाठी एक वार ठरवून घेऊ शकतो.

६. काही पदार्थ घरी बनवता येतील उदा. पास्ता, पिझ्झा, पाव- भाजी.

७. घरातल्या सगळ्यांशी बोलून खाण्यापिण्याचे नियम ठरवायला हवेत. आणि नियम सगळ्यांनीच पाळायला हवेत.

झोपण्याच वळण –

१. साधारण तीन वर्षांपर्यंत मुलं १० ते १२ तास झोपतात. त्यापुढे साधारण ९ ते १० तासांची झोप आवश्यक आहे.

२. मुलांनी भरपूर खेळायला हवं, खेळातून व्यायाम होतो, शरीरातल्या शक्तीचा वापर होतो आणि मुलं जेवून लवकर झोपतात. घरी, सोसायटीत जर पुरेसं खेळणं होत नसेल तर तीन वर्षांच्या पुढे ग्राउंड किंवा खेळ खेळण्यासाठी पाठवता येऊ शकेल.

३. झोपताना स्क्रीनटाईम टाळावा. त्यापेक्षा मुलांना आपण पुस्तक वाचून दाखवू शकतो.

४. झोपेची जागा निश्चित हवी, दिवे बंद करून, शांत गाणी किंवा गोष्टी ऐकवत मुलं शांतपणे झोपू शकतात.

अभ्यासाचे वळण –

१. अभ्यास म्हणजे ओरडा/मार असा समज झाला की मुलांना तो नकोसा वाटतो.

२. “कितीवेळा सांगितलं लक्षात कसं नाही तुझ्या? असा जेव्हा संवाद होतो तेव्हा मुलाच्या मेंदूत काय विचार चालू असतात. “मला जमत नाहीये, मी हुशार नाहीये, आता बहुतेक फटका मिळणार” अशा विचारांमध्ये अभ्यास चांगला होईल का?

३.अगदी लहान मुलं सलग अर्धा तास अभ्यासाला बसूच शकणार नाहीत. 15 मिनिटं झाली आता थोडा खेळ, किंवा ऍक्टिव्हिटी मग परत अभ्यास असे मार्ग शोधायला हवेत.

४.ह्या पानावरच अक्षर छान आहे रे. तू आता उरलेल्या ५ ओळी अशाच लिहिशील?

५.आपण चिडचिड करून त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. वेगवेगळ्या युक्त्यांमधूनच अभ्यास घ्यायला हवा.

मुलांना शिस्त लावण्याचा ताण न घेता कधी शांतपणे, कधी थोड्या कडक शब्दात वळण लावण्याचं काम शेवट्पर्यंत सुरूच राहणार आहे. मुलं आपल्याला बघूनच शिकणार आहेत. आपण जसं वागतो ते कळत नकळत त्यांच्यातसुद्धा येणार आहे. एकूण काय हे सगळं पेलवण्यासाठी संयम, चांगले-सकारत्मक विचार महत्वाचे आहेत. पॉझिटिव्हली या सगळ्याकडे बघायला शिकू या.

Read More blogs on Parenting Here

Chikupiku Author - Renu Gavaskar

Anuja Kulkarni

ChikuPiku Yearly Subscription
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop