fbpx

‘समरहिल’ एक आनंदी शाळा 
१९२१ मध्ये अलेक्झांडर नील यांनी ‘समरहिल‘ नावाची शाळा इंग्लडमध्ये सुरु केली. ही बहुतेक जगातली पहिलीच मुक्त शाळा असावी. या शाळेत मुलांवर फारशी बंधनं नव्हती. गणवेश, प्रार्थना, घंटा, हजेरी, गृहपाठ या गोष्टी समरहिलमध्ये नव्हत्या. मुलांना भरपूर स्वातंत्र्य होतं. त्यांना हवं तेव्हा ती वर्गात बसायची नाहीतर मजेत हुंदडायची, हातांनी खेळ तयार करायची, फुलपाखरांच्या मागे फिरायची. काही मुलं वर्कशॉपमध्ये ठाक-ठूक करून वेगवेगळ्या वस्तू बनवायची. समर हिल खरोखरच एक आनंदी शाळा होती. 

एकदा एक आठ वर्षांचा मुलगा या शाळेमध्ये आला. त्याला त्याच्या आधीच्या शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. या मुलाला आता कुठल्याच शाळेत जायची इच्छा नव्हती. शाळेविषयी राग आणि तिडिक त्याच्या डोक्यात बसली होती. या मुलाचे वडील बळजबरीने त्याला समर हिलमध्ये घेऊन आले. मुलगा प्रचंड रागात होता. तो आतून धुसफुसत होता. त्याने एक दगड घेतला आणि शाळेतल्या एका खिडकीची काच फोडली. प्राध्यापक नील त्याच्या शेजारीच उभे होते. ते या मुलाला काहीच बोलले नाही. मग त्याने एका मागोमाग एक खिडक्यांच्या काचा फोडायला सुरुवात केली. प्राध्यापक नील शांत उभे होते. सलग अकरा काचा फोडल्यावर तो मुलगा हैराण झाला. प्राध्यापक आपल्याला कसं काय ओरडले नाहीत? असा विचार करून तो मुलगा नील यांच्या चेहेऱ्याकडे बघू लागला.
नील यांनी मग काय केलं असेल? त्यांनी एक दगड घेतला आणि बारावी काच फोडली. काहीही न बोलता त्यांनी या मुलाचं मन जिंकून घेतलं. 
प्राध्यापक नील नेहमी म्हणायचे, “तुम्ही चांगले शिक्षक असाल तर मुलांना उपदेश करू नका. त्यांच्या बाजूने उभे रहा, त्यांच्यावर प्रेम करा.”
– पद्मश्री अरविंद गुप्ता

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop